समानतेचा अर्थ

       स्त्रीचं मन व चरित्र देवांनाही कळत नाही तर माणसांना (वाचा पुरुषांना) काय कळणार अशा अर्थाचं एक सुभाषित आहे. ते अर्थातच कोणा पुरूषानंच तयार केलं असणार. एखाद्या स्त्रीनं ते केलं असतं तर तिनं पुरूषाचं मन व चरित्र कळणं अशक्य आहे असं म्हटलं असतं. हे असं वाटणं हे भारतीय स्त्री-पुरूषांमध्ये संवादाचा किती अभाव आहे याचं उत्तम उदाहरण आहे. आपल्या इथं हा संवाद कायमच दडपण्यात येईल अशी एक व्यवस्था जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रांत कार्यरत राहिल याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रीला काय वाटतं ते तिला पुरूषांसोबत वाटून घेता येत नाही आणि पुरूषांचीही तिच परिस्थिती आहे. जो संवाद होतो तो स्त्रीचा स्त्रीसोबत आणि पुरूषाचा पुरूषासोबत. त्यांतून अर्थातच अनेक गैरसमज उपजले तर नवल नाही. हे गैरसमज मुख्यतः असतात एकमेकांना एकमेकांविषयी काय वाटतं किंवा काय हवं असतं याविषयीचे. ज्यांना प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा ऐकीव गोष्टींचाच जास्त आधार असतो.
मुलं वयात येताना त्यांच्या कानावर ज्या गोष्टी पडतात त्यांतील एक म्हणजे, स्त्रीला एकाच पुरूषाकडून सर्व काही हवं असतं आणि पुरूषाला मात्र प्रत्येक स्त्रीकडून एकच गोष्ट हवी असते. आता ही एकच गोष्ट काय ते सांगायला नको. हा विनोद आपल्या समाजांतील पुरूषी लैंगिक वर्चस्वाचा एक उत्तम आविष्कार आहे. तुम्ही कोणत्याही पुरूषाला हा विनोद सांगा आणि तो यावर रागावणार नाही, उलट हसेल. तो विनोद त्याला पटलेला असतो. कारण पुरूषाला प्रत्येक स्त्रीकडून लैंगिक सुखच हवं असतं अशी त्याचीही समजूत असते. त्यांतून त्याच्या तथाकथित पुरुषत्वाला बळ मिळतं. ही समजूत आसपासच्या पुरूषी वातावरणातून त्याच्या मनावर कळत नकळत ठसत राहते.
स्त्री ही फक्त उपभोगासाठी असते व एक पुरूष कितीही स्त्रीया भोगू शकतो असा यांतला मूलार्थ. दुसरा अर्थ म्हणजे स्त्रीनं तिच्या वाट्याला जे येईल ते पवित्र माणून घ्यावं. यात पुरूषांनी स्त्रीच्या लैंगिक किंवा अन्य कोणत्याही गरजांचा विचार केला नाही हे उघडच आहे. कारण यात स्त्रीला निवडीची संधी नाही. आपण असं म्हणत नाही की स्त्रीलाही प्रत्येक पुरुषाकडून एकच गोष्ट हवी असते म्हणून. तिला लैंगिक सुखाची आकांक्षा नाही किंवा एकाच पुरूषाकडून तिचं समाधान होतं हा निष्कर्ष आपण कशाच्या आधारावर काढतो? लैंगिक सुखाची गोष्ट राहू देत. ती आपल्या सध्याच्या समाजाला अजूनही न झेपणारी आणि अनेक संस्कृतीरक्षकांना खटकणारी गोष्ट आहे. आपण इतर गोष्टींबाबत बोलूयात ज्यांचा स्त्री-पुरूष समानतेच्या मुद्द्याशी जवळचा संबंध आहे. माझ्या एका मैत्रिणींनं एकदा असं म्हटलं की, आपल्यावर एकाच माणसावर प्रेम करण्याची सक्ती का केली जाते? सुरूवातीला बरं वाटतं पण नंतर कंटाळा येतो त्याचा. म्हणजे त्याचा तिरस्कार वाटतो किंवा तो नकोसा होतो असं नाही पण मला ज्या गोष्टी हव्या असतात अशा अनेक गोष्टींत तो मला उत्तम साथ देऊ शकत नाही. मला संगीताची आवड आहे पण त्याला नाही. मला फिरायला आवडतं पण त्याला नाही. अशा वेळी अशा गोष्टी आवडत असलेल्या अन्य पुरूषांवर मी प्रेम केलं आणि त्यांच्या सहवासात तो वेळ घालवला तर काय वाईट आहे? त्याच्याकडे व्यभिचार म्हणूनच का बघायचं आपण? प्रेम ही फार मोठी गोष्ट आहे. ती एकदोघांनी करण्याची गोष्ट नाही. आयुष्य देखिल फार मोठी गोष्ट आहे. तीही एकदोघांनी जगण्याची गोष्ट नाही. मी यावर म्हटलं की, यासाठीच तर मित्र असतात ना?” त्यावर तिनं उत्तर दिलं की, लग्न झालं की या मैत्रिलाही बंधनं पडतात. कालपर्यंतचे मित्र आता माझ्या नव-याला चालत नाहीत. त्यावर मी विचारलं, त्याच्या अनेक मैत्रिणी तुला चालतील का?” त्यावर तिनं नाही असं उत्तर दिलं. त्यातली तिची असहायता, तिची खंत, तिची तगमग ही सर्व स्त्री-पुरूषांची आहे.
       या अवस्थेला स्त्रीयांपेक्षा निःसंशयपणे पुरूषच जबाबदार आहेत. शेकडो हजारो वर्षांपासून त्यांनी स्त्रीयांना आपल्या धाकात ठेवलं. नंतर त्यांनी स्त्रीयांना मुक्त करण्याचं ठरवलं तेही त्यांच्या सोयीनुसार किंवा गरजेनुसारच. अजूनही अनेक पुरूष हे त्यांना झेपेल इतपतच स्वातंत्र्य, बरोबरी स्त्रीयांना देत असतात. त्यापलीकडे स्त्रीनं जाण्याचा प्रयत्न केला किंवा खरोखरच प्रत्येक बाबतीत समानता मिळवण्याचा आग्रह धरला तर ती पुरूषासारखी वागते असं पुरूषच नाही तर स्त्रीयाही म्हणतात. स्त्रीचं असं पुरूषासारखं वागणं पुरूषांना काही पचनी पडत नाही आणि अनेक स्त्रीयांनाही नाही. पुरुष जर स्त्रीसारखे वागू लागले तर आणखीनच हाहाकार उडतो. उदा. तृतियपंथी. या दोन्ही बाबी, आपली स्त्री-पुरूषांना समजण्याची क्षमता किती तोकडी आणि हलक्या स्वरूपाची आहे याचं उत्तम उदाहरणं आहेत. स्त्रीयांच्या वागण्यामागे त्यांची आजवरची झालेली सुव्यवस्थित मुस्कटदाबी असते तर पुरूषांना मात्र त्यांचा अहंकार आडवा येतो. आजकालच्या अनेक उदार पुरूषांना स्त्रीयांना बरोबरी देणं मान्य असतं पण ती बरोबरी किती द्यावी व कोणत्या क्षेत्रांत द्यावी हे ठरवण्याचे अधिकार मात्र ते स्वतःकडे राखून ठेवतात. सार्वजनिक जीवनात हे स्त्रीवादी पुरूष उदारपणाचा मुखवटा चढवून वागतात पण खासगी जीवनात मात्र तासनतास तसं वागणं त्यांना झेपत नाही आणि मग त्यांच्यातला पुरूष जागा होतोच. ती आपल्या हातातून निसटेल, आपल्या पुढे जाईल अशी भीती त्यांना वाटते. समानतेचा मुद्दा अहंकारानं सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे स्त्री-पुरूष समानता ही अजूनही आभासीच राहीली आहे.
       समानता फक्त पुरूषांनीच नाही तर स्त्रीयांनीही समजून घेण्याची गोष्ट आहे. स्त्रीमुक्तीचा अनेक स्त्रीयांनी चूकीचा अर्थ लावला आहे, ज्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागत आहेत. समानता हा शब्द आपण फार सहजतेने उच्चारतो पण आपल्या वागणूकीत मात्र तो सहजपणे येत नाही. समानतेचा पाया हा एकमेकांना स्वातंत्र्य देणं व हे स्वातंत्र्य आनंदानं मान्य करणं यावर उभा असतो. यातील, स्वातंत्र्य आणि आनंद, हे शब्द महत्त्वाचे. स्वातंत्र्याचा संबंध व्यक्तीशी असतो. आपण एकमेकांना जोवर मी पुरूष व तू स्त्री म्हणून मी असं वागेन आणि तू तसं वागायचं असं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगू तोवर हे स्वातंत्र्य येणार नाही. तिथं गुलामीच नांदेल. स्त्री-पुरूष दोघेही परंपरेचे, समाजव्यवस्थेचे, कुटुंबव्यवस्थेचे गुलाम म्हणून जगत असतात. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसतं. व्यक्ति म्हणून त्यांना फार अधिकार नसतात. त्यामुळे आधी हा व्यक्तिपणा अंगात रूजायला हवा. तो आला की त्याच्यासोबत स्वातंत्र्य येतं. फक्त ते कोणा एकाचं स्वातंत्र्य नको. ते एकाचवेळी दोघांचंही स्वातंत्र्य हवं, हे स्वातंत्र्य दोघांनाही मान्य हवं आणि तेही आनंदानं; नाईलाज म्हणून नको. या अटी पूर्ण झाल्या तर खरी समानता येऊ शकेल.

       अशा समानतेमध्ये एका स्त्रीला तिच्या लैंगिक अपेक्षांसंबंधी मोकळेपणानं बोलता येईल, फक्त तिच्या पुरूषासोबतच नाही तर अन्य पुरूषांसोबतही. या समानतेत एका पुरूषाला त्याच्या मैत्रिणीसोबत फिरायला जाता येईल आणि त्याचा कोणताही अन्य अर्थ इतर लोक काढणार नाहीत. या समानतेत स्त्री-पुरूष एकमेकांकडे त्यांच्या गुणांमुळे, विचारांमुळे एकत्र येतील; पैसा, प्रतिष्ठा, जातपातधर्म, वय, सामाजिक स्थान, या गोष्टी दुय्यम असतील. समानता आणनं, ती राबवणं ही फक्त पुरूषांची जबाबदारी असणार नाही, (जी सध्या आहे असं मानलं जातं) त्यात स्त्रीचाही तितकाच सहभाग असेल. एकमेकांचा व्यक्ति म्हणून आदर करणं, आपल्यांत गुण-दोष असतात हे स्वीकारणं, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा संकोच न करणं, एकमेकांच्या विकासासाठी सहकार्य करणं, यामुळेच खरी समानता येईल. अन्यथा यापुढेही आपण आपल्यातील गैरसमजूतींच्या आधारेच एकमेकांना समजण्याचा व समजावण्याचा प्रयत्न करत राहू ज्याचा शेवटी दोघांनाही त्रास होईल. एकमेकांशी मोकळेपणानं बोललं की एकमेकांची मनं कळायला वेळ लागत नाही. प्रश्न आहे तो पुढाकार घेण्याचा, जे कळेल ते समजून घेण्याचा आणि एकमेकांच्या मतभेदांचाही आदर करण्याचा. हे जर झालं तर स्त्रीचं मन कळत नाही ही मिथही संपुष्टात येईल आणि पुरूषांना स्त्रीकडून फक्त एकच गोष्ट हवी असते ही समजूतही. 

Comments