गर्भनिरोधनाची साधने
वापरून मुल न होऊ देण्याचा किंवा हवं तेव्हा होऊ देण्याचा अधिकार स्त्रीयांना
मिळाल्यानंतर जबरदस्तीच्या गर्भारपणातून त्यांची सुटका झाली. स्त्री-पुरुष गर्भनिरोधनाची
साधनं मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागल्यानंतर त्यामुळे स्त्री-मुक्तीच्या
दिशेनं, स्त्री स्वातंत्र्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचलल्या गेलं हे यातलं मोठं
यश होतं. पण कोणतंही स्वातंत्र्य हे फुकट मिळत नाही. त्यासाठी किंमत मोजावी लागते.
गर्भनिरोधनामुळे स्त्री-पुरुष दोघांनाही लाभ होत असला तरीही त्याची किंमत मात्र
पुरुषांपेक्षा स्त्रीयांनाच जास्त प्रमाणात चुकती करावी लागते ही वस्तुस्थिती आहे.
पुरुष यामुळे पूर्वीपेक्षा अधिक बेजबाबदार झाले तर स्त्रीयांवर पुन्हा एकदा
गर्भनिरोधनाचीही जबाबदारी येऊन पडली. स्त्री गर्भनिरोधक आल्यानंतर यात वाढच झाली
आहे. गर्भनिरोधक गोळ्या आल्यापासून पुरुषांनी स्वतः गर्भनिरोधक वापरण्यापेक्षा
स्त्रीयांनी त्याचा वापर करावा याकडे त्यांचा आग्रह असतो. स्त्रीयाही त्याला
नाईलाजानं होकार देतात.
पुरुषांना
गर्भनिरोधक वापरण्यात काय अडचण आहे याचा विचार केला तर असं दिसून येतं की त्यात
त्यांच्या मनात असलेल्या काही मिथ्स याला कारणीभूत आहेत. कंडोम वापरल्यामुळे
संभोगसुखात उणीव राहील ही ती मिथ आहे आणि त्यामुळे पुरुष सहसा कंडोम वापरायला
नकारच देतात. त्यापेक्षा स्त्रीनं गर्भनिरोधक गोळी घेतली तर काय बिघडलं असा
त्यांचा प्रश्न असतो. स्त्रीयांनी गोळ्या घेतल्या तर त्यात होणारे फायदे हे
त्यामुळे होणा-या हानीपेक्षा कमीच असतात या गोष्टीकडे पुरुष दूर्लक्ष करतात.
गर्भनिरोधक गोळ्या हा काही हमखास उपाय नाही. त्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट्स
आहेत त्याचा स्त्रीच्या शारिरीक मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
- डोकेदुखी, मळमळ, स्तनांची शिथिलता वाढणे, वजन कमी
होणे, मनःस्थिती बिघडणे, मासिक पाळी चुकणे, संभोगाची आवड कमी होणे, दृष्टीदोष,
योनीस्त्रावांतील जळजळ
अशा अनेक शारिरीक
व्याधी स्त्रीमध्ये उत्पन्न होतात. शिवाय गोळी वेळेवर घेण्याची कसरत व ती तशी
घेतली नाही तर गर्भारपणाची शक्यता याचा ताण तिच्या मनावर कायम असतो.
तुलनेत पुरुषांना
अशा गोष्टींना सामोरं जावं लागत नाही. तरीही ते कंडोमचा वापर करून आपल्या
स्त्रीयांवरची जबाबदारी कमी करण्यासाठी पुढाकार घेत नाही ही दूर्दैवी परिस्थिती
आहे.
गर्भनिरोधकाच्या
जाहिराती पाहिल्या तर त्यात गर्भनिरोधनाची जबाबदारी स्त्रीयांवरच टाकलेली दिसते
आणि मोठ्या चतुराईनं यासाठी या जाहिराती बनवल्या जातात. त्यात तिच्या
स्वातंत्र्याचा उल्लेख करून, तिच्या निर्णय क्षमतेवर विश्वास दाखवून, तिला जाळ्यात
ओढण्याचं काम या जाहिराती करतात. स्त्री-पुरुषांच्या गर्भनिरोधकांच्या जाहिराती
कशा असतात हे पाहिलं तरी त्यांमागचे उद्देश व त्यांच्या विक्रीसाठी वापरण्यात
येणारी भाषा यांत प्रचंड अंतर आढळतं.
पुरुषांना कंडोम
वापरायची इच्छा नसते त्यामुळे हे कंडोम वापरल्यानं त्यांच्या सुखात कशी भर पडेल
यावर या जाहिरातीत भर दिलेला असतो. कंडोमच्या वापरामुळे स्त्रीया तुमच्याशी संभोग
करायला कधीही कुठेही तयार होतील असं यातून बिंबवलं जातं. सुंदर देखण्या
स्त्रीयांचा जाहिरातीत वापर केला जातो. वेगवेगळ्या फळांच्या चवीतले कंडोम आता
बाजारात येऊ लागले आहेत. ही चवीची भानगड पुन्हा पुरुषांना हे कंडोम वापरण्यासाठी
पुढे केलेलं गाजर आहे हे सांगायला नको. कंडोमच्या वापरामुळे पुरुष अधिक काळ संभोग
करू शकतील हाही अशा जाहिरातींचा एक भाग असतो. थोडक्यात काय तर पुरुषांनी कंडोम
वापरावेत ते संभोगसुखासाठी हे यातनं दाखवलं जातं व त्यासाठी त्यांना निरनिराळी
आमिषं दाखवण्यात येतात.
या तुलनेत स्त्री
गर्भनिरोधकांच्या जाहिराती पाहिल्या तर अगदी वेगळे प्रकार दिसून येतो. इथं मोठ्या
चतुराईनं स्त्रीयांना उदात्तपणा बहाल करण्यात येतो. गर्भनिरोधकांचा वापर करणं हा
तुमचा अधिकार आहे, तुमचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे तुमच्या हाती निर्णय घेण्याची
क्षमता येते अशा गोष्टी यांत दाखवल्या जातात. यात क्वचितच तुम्हाला यामुळे फार
संभोग सुख मिळेल असं सांगितलं जात नाही तर त्यामुळे तुम्हाला मातृत्वसुखाची
जबाबदारी पेलता येईल असं दाखवलं जातं. या जाहिरातींत कधीही देखण्य़ा पुरुषांचा वापर
केला जात नाही. हे सारं करताना याचे होणारे दुष्परीणाम काय होतात याविषयी बोललं
जात नाही ज्यांचा वर उल्लेख केला आहे. गर्भनिरोधनाची जबाबदारी मोठ्या खूबीनं
पुन्हा स्त्रीयांवरच टाकली गेली आहे याकडेही इथं दूर्लक्ष करण्यात येतं. त्यामुळे
पुरुष कंडोम न वापरण्याचा आग्रह धरतो आणि स्त्री त्याला बळी पडते कारण तिलाही या
गोळ्यांच्या दूष्परीणामांची पूर्ण माहिती असतेच असं नाही. पुरुष कशा पद्धतीनं
स्त्रीला गंडवतो याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे.
मूल फक्त स्त्रीमुळे
जन्माला येत नाही, त्यात पुरुषाचाही सहभाग असतो. पण यांतला फरक असा की पुरुषासाठी
संभोग हा फक्त संभोग सुखासाठीच असतो आणि मुल जन्माला येणं हे त्याचं फक्त एक
बायप्रॉडक्ट असतं. ज्याची जबाबदारी त्याच्यावर नसते. ती असते स्त्रीवर. जिच्यासाठी
संभोग हा संभोगाच्या वेळेसही तणावाचाच विषय असतो आणि त्यांतून गर्भधारणा झालीच तर
पुढचे नऊ महिने तिलाच सारा त्रास सहन करावा लागलो मूल जन्माला येईपर्यंत. ज्यांतून
पुरुषाची सुटका झाली आहे. तेव्हा निदान या सर्वांचा विचार करून तिला गर्भधारनेच्या
संदर्भात तरी पुरुषांनी आपल्याकडून होईतो सर्व मदत करणं फार गरजेचं आहे. ते एका
समंजस, जबाबदार, संवेदनशील आणि माणूसकी जपणा-या पुरुषाचं लक्षण आहे. समस्त पुरुष
वर्ग ही गोष्ट ध्यानात ठेवेल अशी आशा आहे.

Comments
Post a Comment