मर्द, मर्दानी व मर्दानगी

सिमॉं द बोव्हाँ यांनी त्यांच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथात म्हटलंय की स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडवली जाते. नेमकं हेच विधान पुरुषांच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. जन्मतः कोणालाही आपण स्त्री-पुरुष आहोत हे माहित नसतं आणि बरीच वर्षं आपल्या व आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये काही फरक आहे याची त्यांना जाणीवही नसते. ती जाणीव वयात येण्याच्या काळात सुरू होते. पण जगभर ही नैसर्गिक प्रक्रिया डावलून अगदी लहानपणापासून मुलांवर तू मुलगा आहेस आणि मुलींवर तू मुलगी आहेस याचे शिक्के मारले जाऊन त्याप्रमाणे त्यांची मानसिकता घडवण्याचं काम आपण सारेच करत आलो आहोत. लिंगभेदाची सुरूवात ही अशी घरातून व अगदी लहान वयापासूनच सुरू होते. त्यामुळे पुढे जाऊन त्याचे जे अनेक दुष्परीणाम दोघांच्याही बाबतीत जाणवतात त्याला त्या मुलांचे आईवडील, घरातील अन्य नातेवाईक, शेजारचे लोक थेट जबाबदार असतात. पण त्यांच्यातही ही लिंगभेदाची संकल्पना त्यांच्या घरच्यांकडूनच आलेली असते व अशी एक परंपराच निर्माण होते जिची मूळं अगदी प्राचीन काळात शोधली जाऊ शकतात. सामाजिक संस्कार, धार्मिक संस्कार, कौटुंबिक संस्कार या सर्वांतून लिंग भेदाचा जो मारा सातत्यानं आपल्यावर केला जातो त्यांतून आपण व्यक्ति म्हणून वाढत नाही, विकास पावत नाही तर स्त्री किंवा पुरुष म्हणून वाढत जातो. आपल्या सर्व शारिरीक, मानसिक, भौतिक, अभौतिक जाणीवांवर हा लिंग भेद इतक्या मोठ्या प्रमाणात थोपला जातो की त्यांतून बाहेर पडणं जवळपास अशक्य होऊन बसतं. तसा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला अनेक अडचणींना विरोधांना सामोरं जावं लागतं. ज्याची सुरूवात घरूनच होते.

या लिंगभेद संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार, म्हणजे पुरुष हा कणखर असतो, बळकट असतो, किंवा ज्याला मर्द म्हणतात तसा तो असतो आणि बायका या बावळट, कमकुवत, असतात, हा आहे. त्याची उदाहरणं आपल्या अवतीभवतीच्या व्यवहारात इतक्या मोठ्या प्रमाणात व सहजतेने आढळतात की त्यात काही गैर आहे याची ना पुरुषांना जाणीव होत ना बायकांना. अर्थात अलीकडे त्याबाबत थोडी जागरुकता वाढत चालली आहे पण त्यानं अद्याप परिणामकारक रुप घेतलेलं नाही. ही उदाहरणं काय आहेत? मर्द को दर्द नही होता, पुरुष रडत नसतात, ज्याच्यात धमक नाही तो पुरुष म्हणजे बायल्या, एखाद्या पुरुषाचा पानउतारा करण्यासाठी त्याला हातात बांगड्या भरायला सांगणे अशी अनेक उदाहरणं देता येतील. याच्या विरूद्ध एखाद्या स्त्रीनं काही कर्तृत्त्व दाखवलं तर ती मर्दानी आहे, ती वागण्याबोलण्यात मोकळी असेल तर ती पुरुषी आहे ( ती चालू आहे आणि उपलब्ध आहे हेही), तू माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे वगैरे. या दोन्ही प्रकारांत स्त्रीयांनाच कमी लेखण्यात आलं आहे हे तर आहेच पण त्याचवेळी पुरुषांवरही अनावश्यक महानतेचं दडपण आणून त्यांचंही मानसिक खच्चीकरण करण्यात येतंय हे दिसून येईल. स्त्री-पुरुषांना व्यक्ति म्हणून न वागवता त्यांच्यावर लिंगाधारीत जाणीवा थोपून त्यांच्याकडून तथाकथित स्त्री-पुरुषांचीच कामं केली गेली पाहिजे असा आग्रह धरण्यातून या चूकीच्या असमंजसपणाच्या धारणा तयार झाल्या आहेत.
मर्द को म्हणजेच पुरुषांना दर्द होत नाही अशी एक धारणा आहे. ते रडत नसतात अशीही. पुरुष काही लोखंडाचे बनलेले नसतात त्यामुळे त्यांना जखमा झाल्याच तर त्यांतून रक्त वाहतंच, हाडं दुखावली तर वेदना होतातच पण त्या न दाखवता जो मुकाटपणे सोसतो तो खरा मर्द हे या धारणेमागचं कारण. ही सहनशक्ती आहे आणि तिचा लिंगाशी काहीही संबंध नाही. सहनशक्तिच्या परीक्षेत पुरुष नाही तर स्त्रीया कायम त्यांच्या पुढे आहेत. प्रसवकाळात जी स्त्री आपल्या मुलाला जन्म देते त्या वेदना जगातील कोणताही पुरुष सहन करू शकत नाही. त्याची तुलनाच करता येत नाही. शारिरीक श्रमांच्याच बाबतीत नव्हे तर मानसिक सहनशक्तिच्या बाबतीतही स्त्रीया या पुरुषांपेक्षा कायम पुढे असतात. स्त्रीया रडतात वारंवार रडतात त्या त्यांच्या नैसर्गिक शारिरीक रचनेमुळे. त्याचा त्यांच्या कमकुवतपणाशी काहीही संबंध नसतो. ती विरेचणाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे मन हलकं होतं आणि शरीराचा ताण कमी होतो. स्त्रीयांना ज्या शारिरीक व मानसिक दबावातून जावं लागतं त्याला तोंड देण्याची ही नैसर्गिक बचाव यंत्रणा आहे. पुरुषांमध्ये ती नसते, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून सहसा आसवं बाहेर पडत नाहीत पण त्यामुळे त्यांच्यात एक अंतर्गत ताण निर्माण होतो जो त्यांच्या हिंसक वागण्याला जन्म देतो. त्यामुळे रडणं ही काही कोणाच्या योग्यतेची कसोटी नाही. पुरुष रडतात म्हणून ते बायकी ठरत नाहीत. तसं त्यांना म्हणणं हा स्त्रीयांचा अपमान करणं आहेच पण त्या पुरुषांवरही अनावश्यक दबाव टाकण्यासारखं आहे. उलट तणावात पुरुष जितके रडण्याचा प्रयत्न करतील तितकं त्यांना बरंच वाटेल.

स्त्री प्रतीकांचा अपमानास्पद वापर करून पुरुषांना हिनवण्याची एक घाणेरडी प्रथा आपल्यात रुढ आहे. एखाद्याच्या हातात बांगड्या भरणे, किंवा भरायला सांगणे यांतून त्या पुरुषाचं कर्तृत्त्व नाही हे सूचीत केलं जातं. पण त्याचा दुसरा अर्थ ज्या स्त्रीया बांगड्या भरतात त्या कर्तबगार नाहीत असा होतो हे लोकांच्या लक्षातच येत नाही. बांगडी हे सौभाग्याचं लक्षण आहे, स्त्री सौंदर्य खुलवणारा दागीणा आहे, पण त्याचा संबंध हा नको त्या गोष्टीशी लावण्यात आला आहे. बाया घरात जी कामं करतात तितकी कामं पुरुष बाहेर करत नसतात. बायकांना घरात डांबून ठेवायला पुरुषी मानसिकता जबाबदार आहे. आज बायका बाहेर पडून जी कामं करताहेत ती बघता त्या कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत हेच सिद्ध होतं. तरीही आपण अजूनही त्या वर्चस्ववादी मानसिकतेतून बाहेर पडलो नाही.


स्त्रीयांच्या बाबतीतही त्यांच्या कर्तबगारीचं माप हे पुरुषी प्रतीकांनीच मोजले जातात. म्हणजे एखाद्या स्त्रीला ती मर्दानी आहे असं म्हणणं, किंवा ती पुरुषासारखी खमकी आहे असं म्हणणं. मूळात याची काय गरज आहे? स्त्रीच्या कर्तबगारीला नेहमी पुरुषांच्या तुलनेतंच मोजायची काहीही गरज नाही. आणि पुरुषांनाही स्त्रीयांच्या क्षमतेवरून टोमणे मारून हिनवणंही चुकीचंच आहे. दोघेही शारिरीक व मानसिकदृष्ट्या निसर्गतः वेगळे आहेत आणि या वेगळेपणाचा कोणत्याही अहंकारावीना सहजपणे स्वीकार करणं आवश्यक आहे. त्यांना व्यक्ति म्हणून वागणूक देणं महत्त्वाचं आहे. त्यांची एकमेकांशी तुलना करण्यापेक्षा त्यांना स्वतंत्रपणे वाढण्याची संधी देणं महत्त्वाचं आहे. जिथं कोणत्याही दडपणावीना हे स्वातंत्र्य दिलं जातं तिथं त्यांचा सर्वांगीन विकास होतो व जिथं हे होत नाही तिथं त्यांची अधोगती होते. जी पुढच्या पिढीतही उतरत जाते. हे दुष्टचक्र संपवण्याची सुरूवात आपण आता आपल्यापासूनच करायला हवी. स्त्री-पुरुष दोघेही आपापल्या परीनं जसे श्रेष्ठ आहेत तसंच त्यांच्यात काही उणीवाही आहेत. व्यक्तिनुसार त्यात बदल होत असतो. एकमेकांना ओळखून एकमेकांना पुरक ठरूनच त्यांना एकमेकांची अधिक चांगल्या पद्धतीनं मदत करता येईल, ज्यात त्यांचाही वैयक्तिक विकास होईल. तेव्हा आपण प्रगतीचा मार्ग चालायचा की अधोगतीचा हे ज्यानं त्यानं ठरवण्याची गरज आहे. त्याचे जे परिणाम होतील त्यालाही तो व तीच जबाबदार असणार आहेत

Comments