१-
“मुलांना ज्या लैंगिक समस्या असतात त्यांचं मूळ,
पालक लहानपणी मुलांच्या लैंगिकतेबद्दल जो काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद साधतात,
त्याच्यात असतं. त्यामुळे पालकांना मुलांशी योग्य लैंगिक संवाद साधण्याचं
प्रशिक्षण दिलं तर ब-याचशा लैंगिक समस्या उद्भवणार नाहीत. त्यासाठी पालकांचा
लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे.”
२-
“लैंगिकतेची माहिती असली की आपल्या समस्या आपोआप
सुटतात ही समजूत चुकीची आहे. उलट कित्येक समस्या तर माहितींच्या मायाजालामुळेच
निर्माण होतात. माहिती असल्यापेक्षा त्या माहितीचा उपयोग करणं महत्त्वाचं आहे. हा
उपयोग तुम्ही तेव्हाच करू शकाल, जेव्हा तुम्हांला लैंगिकतेची नुसती माहितीच नाही
तर ज्ञानही आहे. हे ज्ञान नसल्यामुळेच आज समाजात लैंगिकतेच्या एवढ्या समस्या उभ्या
राहिल्या आहेत.”
३-
“आज एकातरी आईमध्ये स्वतःच्या वयात आलेल्या मुलीला
जोडीदार मिळेपर्यंत तू खुशाल हस्तमैथुन कर, तुला त्यात काही समस्या आली तर मी मदत
करेन, असं सांगण्याची हिंमत आहे का? निदान हस्तमैथुन
शब्द उघडपणे उच्चारण्याचं धैर्य आहे का? समजा त्या मुलीला
असं कुणी सांगू लागलं तर उलट सांगणा-यांवरच आई-वडील तुटून पडतील आणि म्हणतील की
तुम्ही आमच्या मुलीला वाईट वळण लावताय. अगदी खरं सांग मला, जोडीदार मिळेपर्यंत ती
मुलगी स्वतःची कामवासना कशी बरं भागवणार? जोपर्यंत
लैंगिकतेकडे आपण सकारात्मकतेने पाहात नाही, तोपर्यंत समाजातलं हे चित्र कायम
राहणार.”
हा
संवाद आपल्याकडे इतक्यातच घडण्याची शक्यता नाही. पण ते होईपर्यंत आपण निदान लैंगिक
संवादासाठी पुढाकार घेतला तरी फार मोठा बदल होईल. मुलांसाठी त्यांचे पालकच शिक्षक
असतात. जे कायम राहतात. त्यांच्यात जितका मोकळेपणा असेल तितकं ते दोघांसाठीही
चांगलं आहे. अन्यथा नात्यांमधल्या घुसमटीत किती जीव हकनाक जातात हे आपल्याला माहित
आहेच. हा मोकळेपणा फक्त लैंगिक बाबतीतच नको तर अन्य सर्व गोष्टींतही असायला हवा.
लिंग समानता नसलेल्या आपल्या देशात लैंगिक मुक्ततेच्या गोष्टी करणारी स्त्री हे
दिवास्वप्न ठरू शकेल यात वाद नाही. पुरुषांपेक्षाही स्त्रियांनी या बाबतीत पुढाकार
घेतला तरच हे चित्र बदलू शकेल. आणि त्यांना मदत करणारे पुरुष नक्कीच आहेत. आणि
परिस्थिती बदलत आहे हेही नक्की. माझ्या काही मैत्रिणी माझ्याशी त्यांच्या मासिक
पाळीच्या संदर्भात बोलायच्या. त्यात ना त्यांना अवघडलेपण जायचं ना मला. आणि मला
वाटतं ही एक चांगली गोष्ट आहे. हाच अनुभव इतरांचाही नक्कीच असेल. याविषयी जितक्या
मोकळेपणानं, सहजतेनं आपण बघू तितकं ते चांगलं. घरून, मित्रांपासून,
नातेवाईकांपासूनच ही सुरूवात झाली तर मुलींना अधिक स्वातंत्र्यानं, अधिक
उत्साहानं, अधिक जबाबदारीनं, अधिक आनंदानं जगता येईल, बाहेरच्या जगात अधिक
निर्भयपणे आणि आत्मविश्वासानं वावरता येईल आणि अडचणींशी अधिक समंजसपणानं सामोरं
जाता येईल. हे व्हावं यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करूयात. जर्मेन ग्रीअर म्हणतात
त्याप्रमाणे “जर स्त्रीने स्वतःला मोकळं सोडलंच नाही तर आपण
कुठवर जाऊ शकतो, हे तिला कळणार कसं? जर तिने आपल्या
पायांतले उंच टाचांचे बूट काढलेच नाहीत तर ती कुठवर चालू शकते किंवा किती जोरात
पळू शकते, हे तिला कसं समजणार?”–
Comments
Post a Comment