१-
“हल्लीच्या समाजात पुरुषांचा स्त्रियांकडे
पाहाण्याचा दृष्टिकोन निकोप नाही, हे तर उघडच आहे. पण स्त्रियांचा तरी पुरुषांकडे
पाहाण्याचा दृष्टिकोन निकोप आहे का? याचंही उत्तर नाही
असंच आहे. समाजात वाढत चाललेल्या हिंसाचारांमुळे स्त्रिया पुरुषांकडे साशंकतेने
पाहातात. जसं काही सगळ्या पुरुषांच्या नजरेत पाशवी वासनाच आहे. जसा काही समाजातला
प्रत्येक पुरुष तिचा शत्रूच आहे. तिच्या शरीरावर हल्ला करण्यास तो टपला आहे. ज्या
समाजात स्त्री-पुरुष एकमेकांकडे दूषित नजरेने पाहातात, त्या समाजात लैंगिक
हिंसाचार वाढतील का थांबतील?”
- हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्त्री पुरुषांकडे
व्यक्ति म्हणून पाहताना त्यांच्यात गुण दोष सारख्याच प्रकारे असू शकतात हे वास्तव
स्वीकारण्याची इथे गरज आहे. सा-या स्त्रीया जशा सर्वगुणसंपन्न नसतात तसेच सारे
पुरुषही नालायक नसतात. एकमेकांवर विश्वास दाखवला तर असे गैरसमज दूर होतील.
स्त्रीपुरुषांमध्ये मैत्री जितकी वाढेल तितकं यांच्यातील नाती कमी अडचणीची होतील.
शारिरीक खुलेपणापेक्षाही मानसिक खुलेपणा असला तर या गोष्टी थांबायला अधिक मदत
होईल. दूसरं म्हणजे जगाची वास्तविकता समजून जगणं. ते पूर्णपणे नकारात्मक नाहीच पण
ते पूर्णपणे सकारात्मकही नाही. त्यामुळे सतत जागरूक राहणं गरजेचं आहे. ही सावधता
भीतीत रुपांतरीत मात्र व्हायला नको. किंवा आपला फाजील आत्मविश्वास अगदी सा-या
मर्यादा मोडून काढतील असाही नको. थोडं स्वातंत्र्य आणि थोडं बंधन आणि अखंड
सावधानता बाळगली तर असे प्रकार मोठ्या प्रमाणात टाळता येतील. मुख्य म्हणजे अशा
प्रकारांविरूद्ध आवाज उठवण्यात स्त्रियांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. अती कुठेच
करू नये. पण सामान्य गोष्टी पाळणं आवश्यकच आहे.
२-
“पोर्नोग्राफी आर्ट आणि इरॉटिक आर्ट यातली रेषा
धूसर होती. एका मतप्रवाहाप्रमाणे या दोन्हीतला मुख्य फरक असा होता की
पोर्नोग्राफीत शोषण असतं. ते मर्जीविरूद्ध केलेलं असतं तर इरॉटिकात स्वखुशी असते.”
- पॉर्नवर बंदी आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे अलीकडे
झाला होता. अर्थात कायद्यानं बंदी आणली तरी इंटरनेटवर अशी बंदी आणणं कठीण आहे. पण
यातला महत्त्वाचा मुद्दा असा की हे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणं आहे की नाही
हा. ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्यावर बंदी आणायची गरज आहे का? पॉर्न पाहून माणसं बिघडतात, आणि लैंगिक अत्याचार
करू लागतात हे जर खरं आहे असं माणलं तर चांगले संस्कारी चित्रपट पाहून माणसं
संस्कारी होतात असं माणण्यासारखं आहे. ते खरं नाही हे सा-यांनाच माहित आहे. म्हणजे
या दोन्ही बाबी चूकीच्याच आहेत. पॉर्न नव्हते तेव्हाही स्त्रियांवर आणि
पुरुषांवरही अत्याचार होतंच होते. मला व्यक्तिशः असं वाटतं की काही गोष्टी उघडपणे
करायच्या नसतात. बोलायच्या नसतात. त्यातील ही एक गोष्ट समजूया. ज्याला पाहायचे
आहेत त्यानं पहावे. त्यामुळे जोवर त्याला स्वतःला आणि इतरांना इजा होत नाही तोवर
यावर विचार करायचं कारण नाही. आता तोवर वाट बघायची का असा प्रश्न येऊ शकतो. पण खरं
सांगू का जगात यापेक्षा जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण त्याकडे जास्त लक्ष
देण्याची गरज आहे. आणि पॉर्नपेक्षा व्यक्तिचं चारित्र्य कसं चांगलं घडेल याकडे
लक्ष दिलं तर या समस्या उद्भवणार नाहीत. आम्ही पॉर्न पाहिले त्यामुळे आम्ही
चरित्रहीन ठरलो असं आम्हाला वाटत नाही की आमच्यामुळे स्त्रियांना काही धोका आजवर
झालेला नाही. मी इथे ब-याचदा व्यक्तिगत बोलतोय कारण ही बाब व्यक्तिगत अधिक आहे.
त्यामुळे आपण आपल्यापासूनच या गोष्टी तपासायला हव्यात.
Comments
Post a Comment