शब्द पब्लिकेशन्सने
प्रकाशित केलेली व अंजली जोशी यांनी लिहिलेली विरंगी मी विमुक्त मी या कादंबरीच्या
निमित्ताने हा लेख प्रपंच. कादंबरीच्या ब्लर्बमध्ये लिहिलं आहे की, र. धों. कर्वे
यांच्या विवेकवादी परंपरेशी नाते सांगणारी व स्त्रियांच्या लैंगिकतेवर निर्भीड भाष्य
करणारी ही कादंबरी आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पण दूर्लिक्षित राहिलेल्या
विषयावर कादंबरी लिहिणा-या अंजली जोशी यांचं व ती प्रकाशित करणा-या येशू पाटील
यांचं आधी मनःपूर्वक अभिनंदन. कादंबरीचं उत्कृष्ट मुखपृष्ठ साकारण्यासाठी येशू
पाटील यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. ही कादंबरी चरित्रात्मक कादंबरी आहे. याची
चरित्रनायिका आहे बेटी डॉडसन, ज्या अद्याप हयात आहेत आणि अमेरिकेत वास्तव्याला
आहेत. लैंगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे आणि लैंगिक
मूक्तीचा केंद्रबिंदू आहे हस्तमैथुन, अशी ठाम विचारसरणी असलेली व त्यासाठी
आयुष्यभर लढणार ही बंडखोर बाई. अगदी ज्या अमेरिकेला आपल्याकडे आणि सगळीकडेच
स्वातंत्र्यनगरी समजलं जातं तिथेही डॉडसन यांना जो लढा द्यावा लागला त्यानंतर
भारतासारख्या तथाकथित संस्कारी देशांत किंवा मुस्लिम राष्ट्रांमध्ये अशा विचारांना
किती प्रखर विरोध होऊ शकतो याचा विचारच करावा लागेल. या लेखाचं नियोजन यासाठीच
आहे. डॉडसन यांचा जन्म १९२९ चा. आज त्या साधारण ८६ वर्षांच्या आहेत पण त्यांच्या
संकेतस्थळाच्या माध्यमातून त्या आजही काम करीत आहेत. मुख्य म्हणजे त्यांचं काम
चालविणारी पुढची पिढीही तयार झाली आहे. या कामात फक्त स्त्रियांच नाही तर पुरुषही
सहभागी आहेत. जिज्ञासूंनी, ज्यांचं वय अठराच्या पुढे आहे, एकदा या संकेतस्थळाला
नक्की भेट द्या. डॉडसन मात्र सांगतील की वयाचं बंधन देखील मूर्खपणाचं आहे. मुलांना
लहान वयातच या गोष्टींची माहिती दिली तर त्यांचा संकोच आणि अकारण भीती किंवा गूढता
दूर होईल आणि ते सामान्य नजरेने लैंगिक व्यवहारांकडे पाहू शकतील. लैंगिक शिक्षण
म्हणजे बोगस असतं असंही त्याचं म्हणणं आहे. अर्थात त्यांचे सारेच विचार पटतील असं
नाही किंवा त्यावर पर्यायी विचारही असतील, काळानुसार, समाजानुसार, व्यक्तिनुसार जे
वेगवेगळे राहतील. मुख्य म्हणजे एका महत्त्वाच्या विषयाला त्यांनी वाचा फोडली आणि
त्यासाठी त्यांनी काम सुरू केलं. आपल्याकडे र.धोंनी हे काम केलं होतं. आणि आता
ब-याच काळानंतर अंजली जोशी यांनी प्रथमच एक परखड कादंबरी या विषयावर लिहिली आहे.
ती स्त्री लैंगिकतेविषयी आहे. त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन. कादंबरी
लिहिताना त्यांना ज्या अडचणी आल्या त्याविषयी त्यांनी त्यांच्या मनोगतात लिहिलं
आहे.
चरित्रात्मक कादंबरी
ही जमणं जरा कठीण गोष्ट असते. कारण आपण ख-याखु-या माणसांविषयी लिहित असतो.
त्यामुळे त्याच्याबाबतीत अनेकांना माहिती असते. व कादंबरी वाचताना त्या माहितीशी
वाचक नेहमी तुलना करीत असतो. ही कादंबरी त्यामानाने फारशी मला स्वतःला आवडली नाही
एक कादंबरी म्हणून. सर्वंच चरित्रात्म कादंब-यांच्या बाबतीत हे जाणवतं. निदान मला.
की त्यात प्रसंगांचं फुलवणं अधिक असतं. आणि कधीकधी ते रटाळ कृत्रिम होतं. पण त्यात
लेखकाचा फारसा दोष नसतो. मूळातच ही अवघड गोष्ट आहे. पण तरीही ही कादंबरी अतिशय
चांगली आहे. कोणतीही कादंबरी अपयशी होण्यासाठी हजार कारणं असतात. पण ती यशस्वी
होण्यासाठी एकच चांगलं कारण पुरेसं असतं. ते असलं की तिचे बाकीचे दोष झाकले जातात.
या कादंबरीचा विषय हेच तिचं यश आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय, अत्यंत गरजेच्या
वेळी लोकांपुढे आला आहे. दुसरं असं की यानिमित्ताने पुरुष लैंगिकतेविषयीही एखादी
उत्तम कादंबरी लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे आणि कोणीतरी हे करेल अशी आशा आहे.
कादंबरी वाचताना एका स्त्रीनं स्त्रिलैंगकितेविषयी लिहिलेली ही कादंबरी आहे आणि
त्याची नायिका देखिल स्त्रीच आहे तर यावर पुरुषांनी आपलं मत व्यक्त करण्याचं कारण
काय असा प्रश्न काही स्त्रियांच्या मनात येईल. पुरुषांविषयी स्त्रियांनी बोलायचं
नाही, स्त्रियांविषयी पुरुषांनी बोलायचं, हिंदूंनी मुसलमानांविषयी बोलायचं नाही
किंवा मुस्लिमांनी हिंदूविषयी बोलायचं नाही अशा आपल्या समजूती आहेत. पण मी या
असल्या मूर्खपणाच्या समजूतींवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मी एक पुरुष असलो तरी
याविषयी बोलणार आहे. मला या विषयातील काहीच समज नसती तर भाग वेगळा. किंवा माझा
याच्याशी काहीच संबंध नसता तरीही मी बोललो नसतो. पण मला वाटतं की एक पुरुष म्हणून
स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलण्याचा मलाही अधिकार आहे, आणि मला फारसं ज्ञान
नसेल पण माझे काही विचार मी नक्कीच यात सांगू शकतो. आता या सर्व पार्श्वभूमीवर हा
लेख लिहिलेला आहे. खाली जी अवतरणं दिली आहेत ती मुख्यतः या पुस्तकातीलच आहे. आणि
काही अवतरणं विशेषतः स्त्री हस्तमैथुनाविषयीची ती डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या
पुस्तिकेतील आहेत. त्याच्या अनुषंगानं मी आपल्या देशातील, समाजातील, स्त्री व
पुरुष लैंगिकतेविषयीही काही मतं मांडणार आहे.
ही कादंबरी सर्वांनी
आवर्जून विकत घ्या आणि वाचा. तुम्ही महिला असल्यास नक्कीच वाचा. पुरुषांनीही ती
वाचा. पालकांनी वाचा आणि आपल्या मुलांनाही वाचायला द्या. त्यावर चर्चा करा. जी
वाचली गेलीच पाहिजेत अशी काही पुस्तके असतात त्यापैकी हे एक पुस्तक आहे.
मी स्वतंत्रपणे काही
लिहिणार नाही. फक्त या कादंबरीत मला जे काही महत्त्वाचे मुद्दे वाटले त्यांच्या
आधारे मी काही लिहिणार आहे. बाकी या विषयासंबंधी या पुस्तकात आहेच.
Comments
Post a Comment