स्त्री-पुरुष संबंध आणि
सहकार्याबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. त्यांतून अधिक
चुकीच्या गोष्टी जन्माला आल्या आहेत. स्त्री-पुरुष समानता, स्त्रीवाद आणि पुरुषांचं होणारं शोषण
या तीन गोष्टींविषयी या लेखात आपण विचार करूयात. तिसरा
मुद्दा वाचून अनेकांना हसूही येईल पण तो आहे आणि त्याविषयी अनेक पुरुषांच्या
संघटना काम करत आहेत. त्याविषयी नंतर. आधी
काही गोष्टी आपण स्पष्टपणे बोलूयात. या तिन्ही प्रकारच्या
विषयांमागे स्त्री-पुरुष हे स्त्री-पुरुष
आहेत, त्यांना माणूस म्हणून किंवा व्यक्ति म्हणून निर्लिंगी
पद्धतीनं वागवलं जात नाही हा खरा प्रश्न आहे. या दोघांचीही
एकमेकांविषयीची मतं आणि एकमेकांसोबतचं वागणं हे लिंगाधारीत असतं. म्हणजे एक स्त्री स्त्री म्हणून एका पुरुषाकडे तो पुरुष आहे याच नजरेनं
पाहते आणि अर्थात पुरुषही तसेच वागतात. दोघांच्याही मनात आपण
माणसं आहोत, व्यक्ति आहोत ही भावना सहसा नसतेच. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं स्त्री-पुरुषांवर जे
संस्कार लादले गेलेले असतात त्यानुसारच दोघेही एकमेकांशी वागत-बोलत असतात. त्यांतून मग त्याच पद्धतीच्या
लिंगाधारीत कृतीही घडत असतात. ज्यात स्त्रीयांनी हे करावं ते
करू नये आणि पुरुषांनी ते करू नये हे करावं अशा मर्यांदांची बंधनं दोघांवरही घातली
जातात. अर्थात हे खरंच आहे की यात जास्त नुकसान हे आजवर आणि
आजही स्त्रीयांचच घडत आलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की
पुरुषांचं नुकसान झालेलं नाही. त्यांचंही झालं आहे फक्त
त्यांना त्याची जाणीव नाही आहे. जी अलिकडे व्हायला लागली आहे.
स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा
अलिकडे काही वर्षांमध्ये जोर धरत आहे. यात दोघेही मानसिक व
शारिरीक दृष्ट्या सारखेच आहेत त्यामुळे त्यांनी एकसारखी कामं करायला हवीत असं
म्हटलं जातं. मुख्यतः स्त्रीयांनी पुरुषांसारखीच सर्व कामं
करावीत असा आग्रह धरला जातो. जिथे पुरुष जातात जे करतात तेच
स्त्रीयांनाही करण्याची अनुमती मिळावी, त्यांच्यावर आजवर जी
बंधनं टाकली गेली आहेत ती उठवून त्यांना मुक्त स्वातंत्र्य मिळावं अशी ही मागणी आहे.
यात वरवर पाहता काही गैर नाही. पण आपण जरा
खोलवर विचार केला तर दिसून येईल की यानं मुख्य प्रश्न सुटणार नाही उलट आणखी काही
नवे प्रश्न निर्माणच होणार आहेत. पहिले हे लक्षात घ्यायला
हवं की आपण तथ्यांचा स्वीकार करण्यात नेहमीच मागे पडतो. खरं
तर त्यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाही. उलट तथ्य नाकारून
आपण स्वतःलाच संकटात घालत असतो आणि अधिक प्रश्न तयार करत असतो. स्त्री-पुरुष समानता ही तात्वीक बाब असायला हवी पण
आपण त्याला शारिरीक व मानसिक गोष्ट करून ठेवली आहे. स्त्री-पुरुष हे निसर्गातःच मानसिक व शारिरीकदृष्ट्या समान किंवा सारखे नाहीत हे
आपण आधी मान्य करायला हवं. ते दोघेही परिपूर्ण नाहीत हे
मान्य करायला हवं. त्या दोघांमध्येही काही बलस्थानं आहेत आणि
काही उणीवा आहेत हे मान्य करायला हवं. सर्वांत महत्त्वाचं
म्हणजे दोघेही एकमेकांच्या सहकार्यानेच परिपूर्ण होत असतात ही गोष्ट आपण मान्य
करायला हवी.
समानतेच्या नावाखाली स्त्री-पुरुष आपली वैयक्तिक स्वतंत्र व एकमेवाद्वितीय ओळख विसरत जाण्याचा धोका
सध्या निर्माण झाला आहे. त्यांतून त्यांना अनेक बाबतीत
स्वतःचीच विनाकारण लाज वाटू लागली आहे किंवा नको तेवढा आत्मविश्वास वाटू लागला आहे.
हे लक्षात घ्यायला हवं की पुरुषाची प्रत्येक गोष्ट केल्यानं
स्त्रीला काहीही फायदा होणार नाही आणि पुरुषांच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे.
काही गोष्टी या ज्याच्या त्याच्या खास असतात आणि त्या त्यांनाच करू
द्यायला हव्यात. प्रयत्नानं एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना
करता येईलही पण त्यातली विशेषतः मात्र त्यात उतरणार नाही. आता
काही उदाहरणं घेऊन ही गोष्ट जरा समजून घेऊयात. आपल्या देशांत
अनेक ठिकाणी महिलांना मंदिर बंदी असते. त्यांच्या मासिक
पाळीचं कारण पुढे करीत या बंदीचं समर्थन केलं जातं. ही मंदिर
बंदी उठवावी म्हणून आंदोलनं होत आहेत, काही ठिकाणी ती यशस्वी
झाली आहेत, कायद्यानंही त्यांना मान्यता दिली आहे. पण यांतून स्त्रीयांचा नेमका काय फायदा झाला आहे त्यांच्या उन्नतीसाठी
याचा विचार कोणी करताना दिसत नाही. देवधर्म आणि त्यांच्याशी
संबंधीत कर्मकांडात स्त्रीयांना अडकवून त्यांचं आजवर कमालीचं शोषण झालं आहे.
मग त्याच शोषणात पुन्हा अडकण्याची ही हौस का? धार्मिक
कर्मकांडांतून स्त्रीयांवर कमालीची बंधनं आली आहेत मग पुन्हा त्यात शिरण्याची ही
धडपड कशासाठी आहे? या मंदिर प्रवेशामुळे त्यांचं जीवन
सुधारण्यास काय मदत होणार आहे? केवळ पुरुषांना प्रवेश म्हणून
आम्हालाही प्रवेश हवा हा बालीश हट्ट आहे आणि मूर्खपणाचाही. पुन्हा
स्वतःहून स्वतःला त्याच धार्मिक बंधनात अडकवून घेण्याचा हा अट्टहास का? मासिक पाळी हा नैसर्गिक शरीरधर्म आहे, पुरुषांना जसं
वीर्य स्खलन होतं तसाच हा प्रकार आहे, याविषयी जागृती
करण्याऐवजी मंदिरात प्रवेशासाठी आग्रह करणं हे प्रतिगामीपणाचंच लक्षण आहे.
समानता ही तत्त्वाची बाब असायला हवी. ती वस्तूनिष्ठ बाब झाली तर ते दोघांनाही फार काळ झेपणारं नाही. स्त्रीवाद ही गोष्ट या समानतेच्या अगदी विरुद्ध आहे आणि ती ना
स्त्रीयांसाठी योग्य आहे ना पुरुषांसाठी. कारण असं दिसून
आलंय की यांत स्त्रीया अत्यंत कर्मठ भूमिका घेत एकांगी बनताहेत. त्याही पुरुषांप्रमाणेच हेकेखोर, दुराग्रही, वर्चस्ववादी बनताहेत जिथं पुरुषांवर बंधंन घातली जातात, त्यांची टिंगल केली जाते, त्यांना हीनवण्यात येतं,
त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात येतो, त्यांना
दुय्यम स्थान देण्यात येतं, अगदी तसंच जसं आजवर पुरुषांनी
त्यांच्याबाबतीत केलं आहे. यांतून कोणतीही चांगली गोष्ट
साध्य होणार नाही. पुरुषांची बरोबरी करण्याच्या नादात ते
स्वतःचं स्त्रीत्व गमावत आहेत. स्त्रीवाद हा
स्त्रीस्वतंत्रतेचा, तिच्या प्रगतीचा मार्ग बनण्यापेक्षा
तिला पुरुषविरोधी, स्वगुलाम बनवणारी बाब ठरते आहे का याचा
धोका निर्माण झाला आहे. जो स्त्रीवाद स्त्रीयांना
पुरुषांपासून दूर नेतो तो चूकीचा आहे. कारण ही गोष्ट बहुधा
लक्षांत घेतलीच जात नाही की सारेच पुरुष अत्याचारी नसतात आणि सर्वंच स्त्रीयांना
पुरुषांविषयी आकस नसतो. कारण त्या दोघांनीही एकमेकांचं
अस्तित्त्व जसं आहे तसं स्वीकारलेलं असतं, त्यांना
एकमेकांविषयी आदर असतो, एकमेकांना मदत करण्यात त्यांना संकोच
वाटत नाही. अतिरेकी स्त्रीवादातून पुरुष शोषणाचे प्रकार
जन्माला आले आहेत. त्यांचं प्रमाण अर्थातच कमी आहे पण ते आहे.
त्यांतून पुरुषांना स्त्रीयांचा तिटकारा निर्माण होण्याचं प्रमाणही
वाढत आहे आणि परिणामी स्त्रीयांना पुन्हा आपला स्त्रीवाद पुढे नेण्याचं कारण मिळत
आहे. हे एक दुष्टचक्र आहे ज्यांतून दोघांचीही सुटका होणं
कठीण होत जाईल.
स्त्रीपुरुष दोघांनाही एकमेकांना नाकारून प्रगती करता येणं अशक्य नसलं
तरी अतिशय कठीण आहे. एकमेकांचा एकमेकांशी
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध हा येतच राहणार आहे. त्यांच्या
शारिरीक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गरजा भागवण्यासाठी त्यांना
एकमेकांची गरज ही लागणारच आहे. त्यांच्या संबंधात जितका
मोकळेपणा असेल तितक्या सहजपणे या गरजा पूर्ण होतील. त्यासाठी
गरज आहे ती व्यक्ति म्हणून एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांचा
आदर करण्याची आणि कोणत्याही अटींविना एकमेकांना सहकार्य करण्याची. हे करण्याची सुरूवात आपण आपल्यापासूनच करूयात. हा
संवाद पुढेही कायम ठेवूयात. तूर्तास इतकंच.
Comments
Post a Comment