‘शॉर्ट’ माईंडसेट – यांचा आणि त्यांचाही


काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शॉर्ट घातलेल्या महिला तुम्ही पाहिल्या आहेत का असा प्रश्न गुजराथमधील एका प्रचारसभेत केला. त्यावरून अर्थातच वाद उठला. सध्या आपल्या देशात ही काही नवीन गोष्ट नाही. कोणीतरी काहीतरी बोलतो त्यावर आणखी कोणीतरी भलतंच काहीतरी बोलतो. चार दिवस वाद चिघळत राहतो आणि मग सारं काही शांत होतं नवीन वाद उठेपर्यंत. पण यात ज्या मुद्द्यांवरून वाद झाला ते मुद्दे सोडवण्यासाठी ना हे प्रयत्न करतात ना ते प्रयत्न करतात. या प्रकरणातही हेच घडलंय.
राहुल गांधींना खरं तर संघात महिलांचा सहभाग फारसा नसतो याविषयी बोलायचं होतं. पण ते बोलण्याआधी त्यांनी पुरेसा अभ्यास केला नाही. त्यात त्यांची चुक आहे आणि त्यांच्या सल्लागारांचीही. किंवा असंही असेल की हे सारं जाणूनबुजून केलं गेलं असेल. कारण संघानं अलिकडेच आपला गणवेष बदलला आहे आणि हाफ पँटमधून संघ आता फुल पँटीत आला आहे. दुसरा मुद्दा हा की संघात फक्त पुरुष स्वयंसेवकच असतात. संघाच्या धर्तीवरच राष्ट्र सेविका समिती आहे आणि त्यांच्या स्वतंत्र शाखा चालतात. त्यामुळे राहुल गांधींचा मुद्दा गैरलागू आहे. हे त्यांना माहित नसेल असं वाटत नाही. पण सध्याच्या राजकारण्यांची विचार क्षमता लक्षात घेता त्यांना खरंच ही गोष्ट माहित नसूही शकते. हे त्यांच्यापेक्षा आपलंच दूर्दैव्य आहे.
आता संघानं तरी यावर समजूतदारपणा दाखवत चूप रहावं ना पण नाही. सध्या त्यांच्या एका संघटनेची सत्ता असल्यामुळे त्यांना चेव आला नसता तर नवल नाही. तो आलाही. त्यांनीही यावर बाणेदारपणे उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा, पुरुष हॉकी किंवा फुटबॉल संघात शॉर्ट्स घातलेल्या महिला तुम्ही पाहिल्या आहेत का असा अवघड प्रश्न राहुल गांधींना त्यांनी विचारला. पण या दोघांनीही ही भाषणबाजी करताना महिलांना मात्र गृहीतच धरलं.

आता यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकारणी आपल्या सोयीसाठी महिलांचा वापर कसा करतात याचा. एकूणच राजकारणात महिलांची संख्या फारच कमी आहे. कॉंग्रेसमध्ये तर दोनदा महिला अध्यक्ष असूनही महिलांना फार स्कोप तिथं मिळालाय असं झालं नाही. भाजपही त्याला अपवाद नाही. पण संघात महिला नाहीत यावरून राहुल गांधी जे बोलले ते चुकीचं आहे असं मात्र नक्कीच नाही. आता संघानं समानतेच्या मुद्द्यावरून स्त्री-पुरुष दोन्ही स्वयंसेवकांना एकत्र आणावं असं आपल्यातील समानतावादी लोकांचं म्हणणं असू शकतं पण संघाच्या सनातनी विचारसरणीला ते कधीच पटणार नाही. त्यामुळे ते जेव्हा स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याच्या वगैरे गोष्टी करतात तेव्हा त्यांचा ढोंगीपणाच उघड होतो. तर दुसरीकडे काँग्रेस काय किंवा दुसरे राजकीय पक्ष काय, महिलांची परिस्थिती ही अशीच पुरुषांच्या मागेच राहण्याची आहे. त्यामुळे त्यांनाही इतरांना काही बोलण्याचा हक्क खरं तर नाही. हे असं करण्याआधी त्यांनी या परिस्थितीची विचार केला असता आणि ती बदलण्यासाठी काही काम केलं असतं तर बरं झालं असतं. पण तसं होण्याची शक्यता नाही कारण या सर्वांचाच माईंडसेट महिलांच्या बाबतीत अजूनही शॉर्टच आहे. पण यांच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही की महिला या गोष्टींतून काही शिकणार आहेत की नाही हा आहे. आपल्यावरचा हा अन्याय ते असाच सोसत बसणार की त्याविरूद्ध आवाज उठवणार? की पुरुषांनी त्यांच्यावर दाखवलेल्या दयेखाली उपकृत होऊन यापुढेही त्यांच्या तालावर नाचत राहणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच द्यावी लागणार आहेत. एरव्ही पुरुषांची ही शॉर्ट मानसिकता कधीची बदलणार नाही. 

Comments