शौचालयं आणि स्त्री सन्मान



सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिम जोरात चालवली जात आहे. या मोहिमेतला एक महत्त्वाचा भाग आहे हागणदरी मुक्त गावाचा. त्यासाठी गावांमध्ये प्रत्येक घरी शौचालयं असली पाहिजेत, लोकांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. ही अर्थात चांगलीच गोष्ट आहे. पण एखादी गोष्ट चांगली असली तरीही तिची अंमलबजावनी जर चूकीच्या पद्धतीनं होत असेल तर त्या चांगल्या गोष्टीचंही मातेरं होतं असा अनुभव आहे. सध्या या स्वच्छता मोहिमेत हे घडताना दिसून येतोय.
सकाळच्या वेळी उघड्यावर संडास करणा-या लोकांना समज देण्यासाठी म्हणून कोणा सरकारी अधिका-याच्या डोक्यातून गुड मॉर्निंग पथकाची कल्पना निघाली. या पथकात आरोग्य-सामाजिक खात्यातले कर्मचारी असतात. ते सकाळी गावांमध्ये जातात आणि तिथं उघड्यावर बसलेल्या लोकांना तसं न करण्याची समज देतात. किंवा त्यांनी ती द्यावी असं यात गृहीत असावं असं मला वाटतं. प्रत्यक्षात मात्र या पथकानं काही वेगळंच करणं सुरू केलंय. त्यांनी उघड्यावर संडास करणा-यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, त्यांच्या गळ्यात हार घातले. त्यांना लाज वाटेल, त्यांचा अपमान होईल या भितीनं तरी ते पुन्हा उघड्यावर संडास करणार नाहीत असा या पथकाचा दावा आहे. पथकाच्या या कामगिरीतून बायकाही सुटल्या नाहीत. हे प्रकार आता इतके वाढले आहेत की अनेक बायका ज्या संडासला जात नव्हत्या त्यांनाही या पथकानं पकडून पोलिस स्टेशनला नेलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, दंड वसूल केला. या अर्थात तुरळक घटना आहेत पण त्या झाल्या आहेत आणि असं करण्याची हिंमत या पथकानं दाखवावी ही यातली गंभीर बाब आहे.
आपल्या देशांत प्रचंड लोकसंख्या आहे. गरीबी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जवळचा पैसा कोणत्या गोष्टींवर खर्च करायचा याला अर्थातच मर्यादा असतात आणि त्याचे प्रत्येक माणसाचे प्राधान्य क्रम ठरलेले असतात ज्यात संडास बांधणं हा मुद्दा सहसा नसतोच. पण सरकारनं हा मुद्दा लक्षात न घेता सरसकट सक्तीची संडासबंदी करून लोकांना सळो की पळो करून सोडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. याचा सर्वांत जास्त फटका नेहमीप्रमाणेच स्त्रियांना बसतोय. कारण त्यांना एकतर गाव जागा व्हायच्या आत आणि पुरुषांची वर्दळ वाढण्याच्या आत संडासला जाऊन यावं लागतं. यांतून त्यांना कितीतरी अडचणींना तोंड द्यावं लागतं. रोजचं एक देहकर्म करणंही त्यांना अत्यंत त्रासाचं होऊन बसतं. त्यांच्या घरचे पुरुष त्यांना संडास बांधून देत नाहीत. कारण अनेकांजवळ मूळात पैसाच नसतो. सरकारनं तो दिला तर तो अपूरा असतो. ज्यांना मिळतो ते त्यातही भ्रष्टाचार करतात. पण सरकार या गोष्टी लक्षात घेत नाही. त्यांची सक्ती सुरू होते आणि बायकांना त्याचा फटका बसतोय. सरकारला विनंती की त्यांनी हे थांबवावं. ही योजना चांगली असेल पण तिच्या अंमलबजावणीतल्या त्रूटी आधी दूर कराव्यात. पुरुषांनीही आपल्या घरातल्या बायकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी उपाय करावा. आणि हे जोवर होत नाही तोवर या गुड मॉर्निंग पथकाच्या सदस्यांनी आपल्याला उत्साहाला आवर घालावा. अन्यथा लोक खवळले तर यांचं काय काय बंद होईल ते सांगता येणार नाही. स्वच्छ भारत योजना चांगलीच आहे पण ती स्त्रीच्या आत्मसन्मानापेक्षा मोठी नाही याची संबंधितांनी आठवण ठेवावी हे उत्तम. 

Comments