हलाला आणि मुस्लिम स्त्रिचे स्वातंत्र्य

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नुक्ताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि मुस्लिम स्त्रियांना एकतर्फी मिळणा-या तलाकमधून सुटका आणि नुकसानभरपाई मिळण्याचा रस्ता मोकळा झाला. आपल्या राज्यात सध्या हलाला या तलाकच्या आणखी एका प्रकारावरून काहीसा वाद निर्माण झाला आहे. तो सध्या मर्यादित स्वरुपात आहे पण त्याविषयी माहिती करून घेणं आवश्यक ठरेल. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या हलाल या नावाच्या कादंबरीवर आधारीत याच नावाचा चित्रपट सध्या प्रदर्शित होणार आहे. त्यावरून एका मुस्लिम संघटनेनं काही आक्षेप घेतला म्हणून हलालाविषयी थोडी माहिती घेऊ या.
हलाला:
#
अब चौथी बार उनकी आपस में निकाह करने की कोई गुंजाइश नहीं लेकिन सिर्फ ऐसे कि अपनी आज़ाद मर्ज़ी से वो औरत किसी दुसरे मर्द से शादी करे और इत्तिफाक़ से उनका भी निभा ना हो सके और वो दूसरा शोहर भी उसे तलाक देदे या मर जाए तो ही वो औरत पहले मर्द से निकाह कर सकती है, इसी को कानून में हलाला कहते हैं.
लेकिन याद रहे यह इत्तिफ़ाक से हो तो जायज़ है जान बूझ कर या प्लान बना कर किसी और मर्द से शादी करना और फिर उससे सिर्फ इस लिए तलाक लेना ताकि पहले शोहर से निकाह जायज़ हो सके यह साजिश सरासर नाजायज़ है और अल्लाह के रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) ने ऐसी साजिश करने वालों पर लानत फरमाई है.
       वर जे काही सांगितलं आहे त्याचा साधा सोपा अर्थ म्हणजे विवाहित जोडप्यानं घटस्फोट घेतल्यानंतर जर त्या दोघांना पुन्हा एकत्र यायचं असेल, विवाह करायचा असेल तर त्यासाठी आधी त्या पत्नीला इतर कोणा पुरुषाशी विवाह करावा लागतो. नंतर त्याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरही तिला पहिल्या पतीशी (त्याचीही इच्छा असल्यास) निकाह म्हणजे लग्न करता येऊ शकतं. हा झाला निकाह हलाल म्हणजे वैध विवाह. त्यालाच हलाला म्हटलं जातं. आता वरील हलालाची व्याख्या वाचली की त्यात काय अभिप्रेत आहे ते कळून येईल.
१-       दुस-या विवाहात पती मरण पावला किंवा त्यानंही तलाक दिला आणि त्यावेळी जर पहिल्या पतीची इच्छा असेल आणि अर्थातच त्या पत्नीचीही, तरच हा विवाह होऊ शकतो.
२-       यात योगायोगाला महत्त्व दिलं गेलं आहे. जाणीवपूर्वक जर असं करण्यात आलं तर तो विवाह नाजायज ठरवला जातो हे इथं लक्षात घ्यायला हवं.
३-       याचा अर्थ हा देखिल होतो की दुस-या विवाहात घटस्फोट मिळालेली किंवा विधवा झालेली स्त्री जर आपल्या पहिल्या विवाहाच्या पतीशी लग्न करू इच्छित असेल तर तिला ती संधी मिळावी यासाठी हा विवाहाचा प्रकार आहे. त्यामुळे घटस्फोटीत किंवा विधवा स्त्रिच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळते जी एकूणातच चांगली गोष्ट आहे.
आता यावर आक्षेप का घेण्यात येतात किंवा वाद का उठतो त्याविषयी पाहुया.
१-       पहिला आक्षेप घेणा-यात अर्थातच कट्टर हिंदू संघटना असतात ज्या येता जाता कुराणावर आणि मुसलमान चालिरितींवर आक्षेप घेत असतात. कुराण न वाचताच ते हा आक्षेप घेतात. काही लोक कुराण वाचल्याचा आधार घेतात आणि टीका करतात. तर याविषयी आधी थोडं बोलूयात. कुराणचा अर्थ लावणं ही अवघड गोष्ट आहे. प्रत्येक जण आपल्या मताप्रमाणं कुराणचा अर्थ लावतो त्यामुळे मोठा गोंधळ उडालेला दिसतो. यामुळेच मुस्लिम दहशतवादी कुराणचा आधार घेऊनच दहशतवाद करतात आणि त्याचवेळी शांतीप्रेमी मुसलमान सांगतो की इस्लाम शांतीचा संदेश देतो यामागे हा अर्थ कारणीभूत असतो. शहाण्या माणसानं इथं फक्त चांगला अर्थ लक्षात घेणं आवश्यक असतं. तसं केलं की मग कितीही अर्थ असले तरी त्यामुळे काही चुकीचं घडण्याची शक्यता नसते. हिंदू संघटना असोत किंवा कट्टर मुसलमान असोत किंवा काही मतलबी मुसलमान असोत यांनी मात्र केवळ आपल्या फायद्याचे, स्वार्थाचे चुकीचे अर्थ घेतले त्यामुळे कुराण बदनाम झालेला आहे आणि एकंदरीत मुस्लिम लोकांविषयीही आपल्याकडे बरेच गैरसमज पसरले आहेत.
२-       आता हलालाविषयी. सनातनी हिंदू म्हणतात की यामुळे स्त्रियांवर अत्याचार होतात. तर ते काही प्रमाणात खरं आहेच. पण ही पद्धत मुळात एका घटस्फोटीत किंवा विधवा मुसलमान स्त्रिला पुनर्विवाहाची परवानगी देते ही अत्यंत महत्त्वाची बाब इथं विसरून चालणार नाही. सनातनी हिंदू ती गोष्ट सोयीस्करपणे विसरले आहेत. हिंदू धर्मांत विधवेला पुनर्विवाहाची कधीच परवानगी नव्हतीं आणि इतकंच काय तर सन्मानानं जगण्याचीही तिला परवानगी नव्हती. तो साराच अत्यंत भयंकर प्रकार आहे. आजही विधवेविषयी आपल्या समाजात फार काही चांगल्या गोष्टी प्रचलित नाहीत. घटस्फोटीत स्त्रिविषयीही असाच प्रकार असतो. त्यामुळे सनातनी हिंदूंनी आणि एकूणच हिंदू समाजानं हलालाविषयी मुसलमानांवर विनाकारण ताशेरे ओढण्याआधी याचा नक्की विचार करावा.
३-       हलालामुळे मुसलमान स्त्रिवर अन्याय होतो ही बाब देखिल खरीच आहे. कारण वाईट स्वार्थी माणसं सगळीकडेच असतात जी आपल्या फायद्यासाठी कोणतीही गोष्ट हवी तशी तोडून मोडून आपला स्वार्थ साधून घेत असतात. त्याला मुसलमानही अपवाद असण्याचं कारण नाही कारण तो मनुष्य स्वभाव आहे. ते प्रत्येकच धर्माच्या माणसासोबत खरं असतं. त्यामुळे हलालाचा उपयोग करून मुस्लिम धर्मगुरुंनी, पुरुषांनी मुसलमान स्त्रियांचं लैंगिक शोषण केलं आहे ही बाब देखिल आपण मान्य करायला हवी. पण त्याचा दोष कुराणला देणं चुकीचं ठरेल. ही मुसलमानांची चुक आहे. ती त्यांनी मोकळेपणानं मान्य करून त्यावर सुधारणा करायला हवी.
४-       हलालाला पर्यायी बाब काय असू शकते याचा विचार करताना मूळात हे लक्षात घ्यायला हवं की या प्रकाराचा चूकीचा अर्थ घेण्यात आला आहे. मूळात हलाला हा तेव्हाच घडतो जेव्हा दुसरा विवाह अयशस्वी ठरेल (घटस्फोट किंवा दुस-या पतीच्या मृत्युनं), त्या पत्नीला पहिल्या पतीशी विवाह करण्याची आणि तिच्या त्या पतीलाही हा विवाह करण्याची इच्छा असेल, तरच तो विवाह ठरतो. म्हणजे इथं काही अटी होत्या. पण नंतरच्या काळात मात्र पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर त्याच्याशी विवाह करायचा असेल तर त्या पत्नीला कारण नसताना व तिची इच्छा नसतानाही दुस-या विवाहाच्या बंधनात अडकवण्याचा प्रकार सुरू झाला. यांतूनच मग त्यासाठी या दुस-या नव-याला पैसे देऊन आधीच पटवण्याचे प्रकार सुरू झाले जेणेकरून त्यानं ताबडतोब तलाक द्यावा. पहिल्या पतीशी लग्न करण्यासाठी दुसरा विवाह करून घटस्फोट घ्यायलाच हवा ही विकृती नंतरच्या काळात कधीतरी सुरू झाली जी आजतागायत सुरू आहे. जर त्या पत्नीला दुसरा विवाह करायचा नसेल आणि मधल्या काळात तिच्या पहिल्या पतीला पश्चाताप झाला आणि त्यानं विवाहाची मागणी केली तर काय या प्रश्नाचा विचार यात केलेला नाही. ही या विवाहातली कमकुवत बाब आहे. त्यामागचं कारण हेही असू शकतं की कुराणच्या काळात घटस्फोटीत स्त्री लगेच विवाहबद्ध होत असेल. हे इथं लक्षात घ्यायला हवं. सध्याच्या आधुनिक काळात याचाही विचार करण्याची गरज आहे. हलालाच्या विकृतीला कुराणाची मान्यता नव्हती. कुराण हे फार व्यावहारीक विचार करतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण कुराणचा अर्थ ठरवणारे मौलवी यांनीच या हलालाचं विकृतीकरण करण्यात मोठा सहभाग घेतला हे उघड आहे कारण त्यात त्यांना आर्थिक कमाई होत होती. यांतच मग त्या स्त्रीचं लैंगिक शोषणही सुरू झालं. मध्य पूर्वेतील काही इस्लामी देशांमध्ये अशा माध्यमांतून छुपा वेश्याव्यवसायच सुरू झालेला आहे.

वरील गोष्टींवरून लक्षात येईल की हलालाचं विकृतीकरण झालं त्यात काही लोकांचा स्वार्थ कारणीभूत होता. हे सर्वच धर्मांत घडतं त्यामुळे हिंदूंनी मुसलमानांना याविषयी काही बोलणं चुकीचं आहे. याचा अर्थ त्यांनी बोलूच नये असं नाही पण त्यात धर्मांधता नसावी तर ही विकृती दूर होण्याविषयीची कळकळ असावी. मुसलमानांनीही ही गोष्ट मान्य करून ही विकृती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. उगाच त्यावरून इस्लाम खतरे में है म्हणून हातघाईवर येण्याची गरज नाही. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नाही कारण भारतात असलेलं उदार वातावरण. पण जो जिथं अस्तित्वात असेल तिथूनही तो दूर व्हावा आणि हलालाचा शुद्ध प्रकारच प्रचारात यावा यासाठी मुसलमानांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे. या लेखांतून हलालाविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल अशी आशा आहे. दुसरं म्हणजे हिंदूंनीही उठसूठ कुराणविषयी काही बोलण्याआधी कुराणचं एकदा वाचन करावं, मग वर्तमानात काय सुरू आहे त्याचा विचार करावा, काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यासाठी कोण जबाबदार आहेत याचा विचार करावा. सरळ धर्मग्रंथांनाच दरवेळी दोष देणंही चूकीचं असतं. चांगलं निवडावं आणि वाईट टाकावं ही निवड शेवटी आपल्या हातातच असते. हे सर्वांनाच लागू आहे. काळाच्या ओघात आलेल्या विकृती टाळून मूळ चांगला धर्म पाळला तर त्याविषयी कोणालाही आक्षेप असण्याचं कारण उरणार नाही. 

Comments